ते जे तसे निराळे झाले . . बरेच झाले . .

अक्षरगणवृत्त : आनंदकंद
गण :गा गालगाल गागा गा गालगाल गागा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८२

ते जे तसे निराळे झाले . . बरेच झाले . .
ह्यांना हवे नको जे , ते आयतेच झाले !

कोण्या ऋतूस नावे ठेवायची कशाला ?
हे ऊनपावसाळे त्यांच्या मतेच झाले !

ते आड चालले . . मी नाकासमोर गेलो . .
माझे न काम होता, त्यांचे लगेच झाले !

ही वाद संपण्याची का लक्षणे म्हणावी ?
दे दाखले नवे तू . . हे कालचेच झाले !

गंभीर चेहर्‍यांना येथे हसू दिले मी . .
जे हुंदके दिले मी , त्यांचे हसेच झाले !


लेखनकाल ०७.०४.२००५

——————————————–

प्रतिक्रिया टाका