तेही ठरून गेले . . मीही ठरून गेलो . .

मात्रावृत्त : रसना

 

तेही ठरून गेले . . मीही ठरून गेलो . .
त्यांचे सदा पसारे मी आवरून गेलो !

 

बदलून रूप , काडी येता समोर माझ्या . .
पकडून ओंडका तो सागर तरून गेलो !

 

संकेत तेवढाही झाला मला पुरेसा . .
ते खाकरून गेले . . मी सावरून गेलो .

 

हे दार लोटण्याचे नाटक अता कशाला ?
तुझिया मनात नुकता मी वावरून गेलो !

 

रक्तात दुश्मनाच्या तलवार भिजवुनीही . .
शाईमुळे तहाच्या आम्ही हरून गेलो !

 

सस्त्यांवरील माझे पुसता ठसे जगाने ,
मी चाललोच नाही . .खांद्यांवरून गेलो !

 

….

प्रतिक्रिया टाका