तुझ्या पापणीचा . .
वृत्त : वीणावती
गण : लगागा x ३+ लगा
(सौदामिनी ह्या अक्षरगणवृत्ताप्रमाणे )
तुझ्या पापणीचा इशारा नको . .
मला आश्रितांचा सहारा नको !
कसे शब्द माझे करू मोकळे ?
गडे , आसवांचा पहारा नको .
त्तुला पाहिजे चंद्र उबदारसा ;
तुला सूर्यही तापणारा नको !
पहाटेस ये , भेटण्या एकटी
तिथे चोंबडा शुक्रतारा नको !
जगानेच केला पसारा इथे
अता त्यास माझा पसारा नको .
जिथे लाटाही पाय ओढू बघे
बुडालो तरी तो किनारा , नको !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा