तुझ्या अंतरीचे कळेना जराही . .

वृत्त : भुजंगप्रयात
गण : लगागा लगागा लगागा लगागा

 

तुझ्या अंतरीचे कळेना जराही
दिलाशात काही . . खुलाशात काही !

 

निघाली मला सोडुनी सावलीही
उन्हातील तीही अता साथ नाही .

 

म्हणालीस तू हेच लाजून तेव्हा . .
किती शब्द होता तुझा अर्थवाही !

 

हवेच्या दिशांना हवेतील नावे
कशी पाखरे वाचती ह्या दिशाही ?

 

नको शेर माझे करू पेश कोठे
रुचावी न माझी तुला वाहवाही .

 

खुळा एक पक्षी हवेलीत येतो
जरी आज येथे जुने झाड नाही !

प्रतिक्रिया टाका