टाळले माणसांचे थवे . .

अक्षरगण्वृत्त : वीरलक्ष्मी
गण : गालगा गालगा गालगा
छंदोरचना पृष्ठ क्र. १९२

 

टाळले माणसांचे थवे . .
चाललो मीच माझ्यासवे !

 

पापण्यांच्या घरी पाहुणी . .
अंतरीची न ही आसवे !

 

मी किती श्वास द्यावे तुला ?
जीवनाला पुसाया हवे .

 

आमचे हे जुने चेहरे
काल होते नवेच्या नवे !

 

ओल नात्यांत आहे कुठे ?
फक्त हे कोरडे कालवे !

 

चाळिशी लावली पाहण्या. .
अन् दिसे तेच ना पाहवे !

 

माणसांनीच अंधारले . .
दावताती दिवे काजवे !

 

ढाल पाठीस आहे तरी ,
अंग का चोरती कासवे ?

 

….

प्रतिक्रिया टाका