जे वाटते नवे , ते सारे जुनेच आहे . .

मात्रावृत्त : रसना
लक्षणे : [ गा l गालगाल l गा + , गा l गालगाल l गा + ]
+ म्हणजे निश्चित गुरू .

 

जे वाटते नवे , ते सारे जुनेच आहे . .
आच्छादनात सारे जग नागडेच आहे !

 

झोळी न का भरेना माझी कफल्लकाची
आयुष्य वेचले मी , तेही बरेच आहे .

 

मज जन्मताच गेली चिकटून लाख नाती
शिरपेच हा म्हणावा की , दिव्य पेच आहे ?

 

ह्या माणसात आहे मुक्काम माणसाचा
अन् जंगली पशुही ह्याच्यामधेच आहे !

 

एकेक दीस येथे मोजून काढला मी . .
आता जगायचे जे , ते मोजकेच आहे !

 

कंठात सूर साती झाले जरी पुराणे ,
त्यांनी मला दिलेले गाणे नवेच आहे !

 

माझ्याच का दिशेने हे फेकतात धोंडे ?
मी लागलो हसाया की , हे असेच आहे !

 

.

प्रतिक्रिया टाका