जी नको ती माणसे . .

वृत्त : मंजुघोषा
लक्षणे: गालगागा गालगागा गालगागा

( एका गुरुवर्णाऐवजी दोन लघुवर्ण ही सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त )

 

जी नको ती माणसे भेटून गेली . .
जी हवीशी वाटली संपून गेली !

 

वाट एव्हाची तुझी पाहून , सारी . .
रात्र माझ्या लोचनी जागून गेली .

 

विझविले ह्यांनीच ना तिथेले निखारे ?
तीच वस्ती का पुन्हा पेटून गेली ?

 

तू पहाटे पाहशी नुसतीच स्वप्ने
पाखरे बघ , क्षितिज ओलांडून गेली !

 

बाधतो आहे कुणाचा शाप येथे ?
सावलीलाही उन्हे जाळून गेली !

 

शब्द पुटपुटाले जरी कानात माझ्या ,
ओळ माझ्या अंतरी गाऊन गेली .

 

मोकळे माझे हसू शोधू कुठे मी ?
काळजी तो चेहरा चोरून गेली !

प्रतिक्रिया टाका