जीवना , पुरेत चोचले तुझे . .

सूट घेतलेले अक्षरगणवृत्त : श्येनिका
लक्षणे : गालगाल गालगाल गालगा
छंदोरचना पृष्ठ क्र.

 

जीवना , पुरेत चोचले तुझे . .
कालचे नकोत दाखले तुझे !

 

न्होकवू नकोस चेहरा असा . .
भाव मी अबोध वाचले तुझे .

 

तू कशास हासशील मोकळी ?
बोलणेच तोंडदेखले तुझे !

 

अंतरी असूनही जिते झरे ,
प्रेम एवढ्यात आटले तुझे ?

 

स्वप्न मी तुला दिले जपायला . .
आज हात रक्तमाखले तुझे !

 

दरवळेल काय ती स्मृती पुन्हा ?
बकुळफूल पुस्तकातले तुझे !

 

.

प्रतिक्रिया टाका