जिवंत होतो म्हणून . .

सवलत घेतलेले अक्षरगणवृत्त : सती + जलौघवेगा
लक्षणे : लगालगागा लगालगागा लगालगागा

 

जिवंत होतो म्हणून जे काळजीत होते ,
निरोप घेताच मी जगाचा . . खुशीत होते !

 

हजार वर्षांत एवढा मी मजेत नव्हतो . .
तुम्ही अता कर्ज फेडले ते बुडीत होते .

 

कशास त्या पत्थरांपुढे शब्द गात गेले ?
मुके असे मैफलीत माझेच गीत होते !

 

तुला – मलाही असे कसे वाटते रुसावे ?
अशी कशी त्या क्षणीच दोघांत प्रीत होते ?

 

समाजसेवेपुढे कुणालाच वेळ नव्हता . .
गरीब अपुले स्वतःच अश्रू पुशीत होते !

 

तुझाच त्या कत्तलीत रमणीय हात होता . .
सखोल ते घावही किती टवटवीत होते !

 

.

प्रतिक्रिया टाका