जितता न ये . .
गण : ललगालगा x ३
जितता न ये , हरता न ये , कसले जिणे ?
रण सोडुनी फिरता न ये , कसले जिणे ?
परक्या घरी कुढता मला दिसतेस , पण . .
मन मोकळे करता न ये , कसले जिणे ?
पडलो जरी , इतरांपरी भवसागरी
बुडता कळे , तरता न ये , कसले जिणे ?
नजरेपुढे भिरभिरतसे फुलपाखरू . .
क्षण सार्थकी धरता न ये , कसले जिणे ?
जगलो उगीचच संपण्यापुरता इथे
मजला उद्या उरता न ये , कसले जिणे ?
अधरात मंत्रित दिव्य-अस्त्र असूनही,
समरात ते स्मरता न ये , कसले जिणे ?
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा