अमुच्यांत जन्मताची बस एक नाळ आहे . .
वृत्त : रसना
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा
( आनंदकंद ह्या अक्षरगवृत्ताप्रमाणे . )
अमुच्यांत जन्मताची बस एक नाळ आहे . .
ह्यांना म्हणून माझा इतका विटाळ आहे !
सूर्योदयास ह्यांची येथे सकाळ होते
सूर्यावरील माझी तेथे सकाळ आहे !
‘ प्राण्यांवरी दया ‘ हा जर मूळ धर्म नसता ,
‘ गोपाळ ‘ एक . . दुसरा का ‘ मेंढपाळ ‘ आहे ?
तुमची अता खुशाली इतकी निवांत नाही
गंजीत टाकलेले हे मी किटाळ आहे !
आले नवीन शासन . . आला नवा जमाना
स्वप्नांतल्या सुखांचा आता सुकाळ आहे .
मी आपुल्याच हाती लिहिणार भाग्य माझे
ओळींमधून जेथे कोरे कपाळ आहे !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा