जगण्यातच माझ्या खास खुमारी नव्हती. .

मात्रावृत्त : भूपति
लक्षणे : मात्रा २२ ( गा l प l प l गा + )
छंदोरचना पृष्ठ क्र. ३६३ .( प म्हणजे ८ मात्रा ; + म्हणजे हमखास गुरू )

जगण्यातच माझ्या खास खुमारी नव्हती. .
बागेत फुलेही दरवळणारी नव्हती !

मी आज पुन्हा त्या गेलो सरिताकाठी . .
पण , तरुणपणीची लहर किनारी नव्हती

नवश्रीमंतीची खुपते रेशिमगादी . .
ती आरामाची गोणपथारी नव्हती !

कळलेही नाही युद्ध कधी सरले ते ..
जी एक जखम . . तीही दुखणारी नव्हती !

सगळेच तयारीनिशी जिंकण्या आले . .
हरण्यास एक माझीच तयारी नव्हती !

मिटताना डोळे , स्वप्ने भवती जमली . .
कवळाया ती , माझ्यात उभारी नव्हती !

—————————————————-
लेखनकाल १७.११.१९८६
———————————–

प्रतिक्रिया टाका