श्री. दिलीप पांढरपट्टे

गझल . .

चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला
उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला

मी शस्त्र ठेवले अन् तितक्यात वार झाला
हा जीवनातुझा रे खुनशी प्रहार झाला

सैतान कालचा जो त्याचेच राज्य आले
एका दिसात तोही परवरदिगार झाला

गातात मर्सिया ते , हाही विनेद आहे
त्यांच्याच संगिनींनी तो काल ठार झाला

अव्हेरलेस तूही हेही बरेच झाले
माझा मरावयाचा पक्का विचार झाला

ते राजमार्ग सगळे लखलाभ हो तुम्हाला
गेलो जिथेजिथे मी रस्ता तयार झाला

हातात हात ज्याचा मी घट्ट दाबलेला
देऊन चार वचने तोही पसार झाला

सारे जरी मिळाले , तो मागतोच आहे
सत्तेत राहूनी तो भलता हुशार झाला

तो हुंदके न देतो , तो फक्त गीत गातो
तो तालमीत माझ्या इतका तयार झाला

हे राज्य ही बुडाले गद्दार सर्व झाले
कोणी पिसाळ झाला , कोणी पवार झाला

प्रस्थापितांविरोधी तो एक आग होता
मिळताच एक खुर्ची , तो थंडगार झाला

प्रतिक्रिया टाका