चिऊ . .

इवली वाडी . . रानझाडी . .
रानझाडीत
सुरेख माझं घर कौलारू . .
मंगलोरी पंखांच !

 

– – लहानपण
पाखरागत अंगणबांधी झुलणारं
भुर्रकन् उडून गेलेलं . .
कावळ्या – चिमण्यांच्या गोष्टींचे
पिंजरे मात्र
उरात अजून
तसेच टांगलेले !

 

. . आकाशात तरंगणारे
तेच शुभ्र शुभ्र जुने थवे
बगळ्यांचे
तीच फुलं जुनीफुनी
तेच जुनेमुने जादूरंग . .
काठावरची तीच चिवचिव
नदीचंही जुनंच कातळअंग

 

, तेच लहानपण जुनंपानं
मोठेपणचा मीही तिथे
तेवढाच लहान . .
चिमण्या चिमण्या गोष्टींची
तशीच तहान !

 

जुनी चिऊ मग होऊन येते माझी कविता . .
एक घास देऊन जाते . . माझी कविता !

————————————————–
कवी : वा. न. सरदेसाई
————————————————-

प्रतिक्रिया टाका