खोट्टं घर

आई आणि बाबांना
कळत असतं तर –
इतकं मोट्ठ कशाला
बांधलं असतं घर ?

 

पहिलं घर कसं होतं
छानुकलं छोट्टं
दोन खोल्या होत्या तरी
असं नव्हतं खोट्टं !

 

– इथे उंच पायर्‍यांचा
ताडमाड जिना
आमचा होतो मोरया
चढता-उतरताना !

 

गुळगुळीत फरशीवर
घसरतात पाय
मी खाली पडले तरी
ह्यांना त्याचं काय ?

 

मोठ्टी माणसं सोप्यावर
वसतात ऐसपैस
मला कुणी म्हणतं का
वरती येऊन वैस !

 

– नवे लोक जमले की
माझी बाहुली रुसते
माझ्याबरोबर तीपण
कोपर्‍यात जाऊन बसते !

 

 

प्रतिक्रिया टाका