कोणती बाराखडी गिरवून गेले आरसे ?
मात्रावृत्त : कालगंगा
.
कोणती बाराखडी गिरवून गेले आरसे ?
चेहरे बघताक्षणी वाचून गेले आरसे !
भेटणार्यांची मने उमगून गेले आरसे . .
‘ नजरभेटी ‘ घेत हे ‘ पटवून ‘ गेले आरसे !
दोष कोणाचा न हा , महिमाच काळाचा असे
ओळखीसुद्धा जुन्या विसरून गेले आरसे !
ज्यास चारित्र्यातले दिल दिसलेच ना सौंदर्यही
बेगडी रूपास त्या भुलवून गेले आरसे .
भेटला जेव्हा हिरा उतरून गेले चेहरे . .
कोळशाच्या संगती उजळून गेले आरसे !
काळजी डोकावते शहरातल्या ऐन्यांतुनी . .
गावच्या जत्रेतले हसवून गेले आरसे !
पाखरांनो , दूर व्हा , समजून मायाजाल हे . .
मोडुनी चोची , तुम्हा फसवून गेले आरसे !
माणसे बाहेरुनी सुलटी जरी दिसली तरी ,
‘ आत ‘ ती ‘ उलटी ‘ कशी दावून गेले आरसे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा