कैफ माझा वेगळा
कैफ माझा वेगळा अन् वेगळी माझी नशा
चालतो मस्तीत , मजला मो़कळ्या दाही दिशा . .
दाटते हॄदयात ते मी
गात जातो मोकळे
साथ त्या गीतांस करती
ऐकणार्यांचे गळे
आसवांतुन पिकवितो मी करुण एखादा हशा . .
धर्म माझा कोणता, ते
आठवेनाही मला
जातही विसरून गेलो
म्हणुन ठरलो मी खुळा
रोजच्या दुनियेत बघतो शाहण्यांची दुर्दशा . .
शक्यतोवर टाळतो मी
वंगल्याची सावली
झोपडीशी हाक मारी
मज उन्हाची माउली
चांदण्या शब्दांत करते तीच माझ्या चौकशा . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा