सौ. संगिता जोशी
गझल . .
कितीदा पुन्हा तूच हरणार वेड्या
समुद्रास गोडा बनवणार वेड्या ?
असावी फुले फक्त बागेत म्हणुनी ,
किती रो़ज काटे उचलणार वेड्या ?
इथे फक्त अन्याय हा न्याय आहे
किती अन् कसा तू झगडणार वेड्या ?
तुला वाटते भ्रष्टता नष्ट व्हावी
कसे पर्वताला हटवणार वेड्या ?
अशक्यास थारा न तव शब्दकोशी
न स्वप्नात सत्ये उतरणार वेड्या
कुणाला हवा गंध रस अन् फुलोरा ?
कुणास्तव उगा तो बहरणार वेड्या ?
इथे फक्त रेताड नापीक माती
इथे काय मेघा बरसणार वेड्या ?
मुभा एवढी की स्वतःला बदल तू
कसा तू जगाला बदलणार वेड्या ?
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा