काय , आयुष्यामधे मी भोगली नाहीत दु:खे ?

वृत्त : व्योमगंगा
गण : गालगागा x ४

 

काय , आयुष्यामधे मी भोगली नाहीत दु:खे ?
एवढे की मी कधीही मोजली नाहीत दु:खे !

 

ह्या जगाला हासताना पाहण्याची हौस होती . .
ह्याचसाठी पापणीशी टांगली नाहीत दु:खे .

 

आसवे माझी मुक्याने लागलो जेव्हा गिळाया ,
हुंदक्यांनी एकदाही बोलली नाहीत दु:खे !

 

भावनांचा ठोक केला केवढा व्यापार त्यांनी !
मी दयेसाठी किलोंनी तोलली नाहीत दु:खे !

 

पाहुणी आली तरीही राहिली वर्षानुवर्षे . .
मात्र , शिष्टांसारखी ती वागली नाहीत दु:खे !

 

.

प्रतिक्रिया टाका