ओळ जुन्या गाण्याची . .
वृत्त : दासी
गण : एकूण मात्रा २४ (६+६+ ६+६ )
ओळ जुन्या गाण्याची ओठी ये सहजपणे
घटकाभर हळव्याशा आठवणी चाळवणे !
विसरणार मी न कधी रात्र तशी . . चंद्र तसा . .
आणि दिवा दोघांनी एकदमच मालवणे !
मधेमधे वार्यावर खिडकीची उघडझाप
दचकत मग मस्त तुझे लाजेने चुळबुळणे .
फुललेला पारिजात . . हलके ये गंध आत . .
श्वासांच्या झुळुकांचे मिठीतले दरवळणे .
ओठ बंद असताना , बोलणार कोण कसे ?
शब्दांविण हवे – नको मनोमनी ओळखणे !
सावध की बेसावध . . डोळ्यांवर झोप अशी . .
तों , कानी पडलेले कुठूनसे आरवणे !
.
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा