एक मी खुळ्यातली खुळी कळी . .

अक्षरगणवृत्त : श्येनिका
गण : गालगाल गालगाल गालगा
छंदोरचना पृष्ठ क्र. १८०

 

एक मी खुळ्यातली खुळी कळी . .
शोधते उभ्या उन्हात साउली !

 

वेचता तुझ्या खुणा इथे – तिथे . .
शीळ वेळुच्या बनात गावली !

 

आठवे असेच काल जाहले . .
आजही तशीच जीभ चावली .

 

मंदशी झुळूक येउनी छळे . .
लागती तुझ्या उनाड चाहुली .

 

नीजही मला कशी शिवेचना ?
पापणीत रात्र रात्र जागली !

 

बोलतात सर्व माझियासवे . .
आणि मी अशी अबोल बाहुली !

 

काव्यलेखन दिनांक ०९.०७.१९८६

 

प्रतिक्रिया टाका