उपयोगच नव्हता तेव्हा . .
वृत्त : विधाता ( हिंदी )
गण : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )
उपयोगच नव्हता तेव्हा , सांगून कुणाला काही
नव्हताच कुणी घेणारा , ऐकून कुणाला काही !
संपती मुक्याने अपुल्या घाईत रोजच्या भेटी
आठेवे बोलण्यासाठी मागून कुणाला काही.
सांत्वनास गेलो म्हणजे सुचती न शब्दही मजला . .
हुंदके द्यायला जमते , मो़जून कुणाला काही !
होताना स्पर्श कळीला खुपणारच होते काटे
मग, उगाच का बोलावे , टाकून कुणाला काही ?
संशयी जगाला नभही ओळखून आहे पुरते . .
ते चुकूनही देते का झाकून कुणाला काही ?
दिसतात मूळचे डोंगर वेगळेच ज्याला त्याला . .
जवळून कुणाला काही . . लांबून कुणाला काही !
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा