इंगित . . .

 

 

 इंगित  . . .

 

माजं नाव वारकरी

माज्या बापाचं इट्टल

उब्या आयुक्षात बगा

न्हाई आमचं पटलं . .

 

झालं बांधून बाशिंग

माजा संसार रंगला

दोन पोरं फुलावाणी

चार बैलबी मोटंला . .

 

गेलो आखारी वारीत

मायबापाला सांगाया

‘ चला घरामंदी माज्या

मीटभाकर खाऊया ‘

 

‘ इटेवरी किती दीस

आसं उब्यानं र्‍हानार

कशापायी ह्यो आन्तासा

तंटा चव्ह्याट्याच्या वर ? ‘

 

– दगडाचे आईबाप

तवां हसले गालात

मला अडान्याला काय

ठावं त्यातलं इंगित ?

 

( आचार्य अत्रे स्मृति कथा-कविता स्पर्धा – नवयुग १९७०’ ह्या तेव्हाच्या भव्यतम खुल्या स्पर्धेत सुमारे पंधराशे कवितामधून ‘ इंगित‘ ह्या कवितेला प्रथम पारितोषिक)

( स्पर्थेचे परीक्षक : कवी श्री . सोपानदेव चौधरी – बहिणाबाईंचे  सुपुत्र )

 

प्रतिक्रिया टाका