आली झोपेची पाहुणी . .
पंख दिव्यांचे लावून दूर जाई रातराणी
किलकिलत्या डोळ्यात आली झोपेची पाहुणी
नाजुकशा भुवयांची
छान तोरणे सावळी
लावी पापण्यांची दारे
आता सानुली सानुली
टक लावून बघते तुला आभाळ-चांदणी . .
चिऊकाऊंचा लागला
रानघरटयांत डोळा
ढगांच्या रे , पाळण्यात
गोरा चंद्रही निजला
ऐक , साखरझोपेत परीकडून कहाणी . .
तुझा चंदनाचा झुला
बघ , दमला हलून
पडे माझ्या हातातला
दोर हळूच गळून
मंद झुळुकेशिवाय इथे येऊ नका कोणी . .
शांत तेवणारी ज्योती
डोळा भरून पाहते
गुणगुण अंगाईची
ओठावरती पेंगते
तुझे दिवसाभरचे शब्द पांखरते कानी . .
प्रतिक्रिया टाका
प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आत जा