आयुष्यभर सुखाच्या मागे पळून झाले . .

मात्रावृत्त : रसना

 

आयुष्यभर सुखाच्या मागे पळून झाले . .
आभास मात्र त्यांचे गोळा करून झाले !

 

आम्हास प्रेम म्हणजे का ठाउकेच नाही ?
इतक्यात वाद अमुचे प्रेमावरून झाले !

 

त्यांच्या मनात आहे आशा अजून थोडी . .
सारेच देव कोठे त्यांचे पुजून झाले ?

 

मी , तू कुठे वयाने उरलोत कोवळेही ?
मध्यस्ठ चांदणेही तितकेच जून झाले .

 

ह्यांना अता कशाची शिक्षा दिलीत तुम्ही ?
की ते गुन्हे ‘ उद्याचे ‘ ह्यांच्याकडून झाले ?

 

माझी अशी दशा का होते तुझ्या स्मृतीने ?
क्षण मोहरून झाले . . क्षण ओसरून झाले !

 

इतका कधीच नव्हता दु:खी पहाटवारा . .
कोठेतरी कळ्यांचे रात्रीत खून झाले !

 

.

प्रतिक्रिया टाका