आमचा पाऊस येतोय् . . .

आमचा पाऊस येतोय् म्हटलं
आमचा पाऊस येतोय् !
आज घरातली माणसं आम्ही जरा लांब ठेवतोय् !
. . . . . आमचा पाऊस येतोय् !

 

पडा गड्यांनो , घराबाहेर
लावू नका वेळ
अंगणात सारे जमले म्हणजे
सुचतात ओले खेळ
— एकेकाचा चेहरा कसा फुलासारखा खुलतोय् !

 

अरे झंप्या , अंगावरचा
शर्ट ठेव काढून
तुमची – आमची पाण्यामधेच
पानं ठेवलीत वाढून
— पडसंबिडसं झालं तरी पर्वा कोण करतोय् !

 

मोठ्ठी माणसं बघा, कशी
टीव्हीपुढं बसतात
पारोशा लोकांना आपल्या
सरीसुद्धा हसतात
— आभाळानेच केलीय् आमच्या आंघोळीची सोय् !

 

बडे लोक छत्रीशिवाय
बाहेर पडणार नाहीत
ह्यांची पाऊसगाणी फक्त
कपाटातल्या वहीत
— आम्हीच तेवढे आकाशाला डोक्यावरती घेतोय् !

 

प्रतिक्रिया टाका