आज नव्यानं लाजते . . .

काळजाची धडधड कोणी चोरून ऐकते
सोळा वरसांत यंदा आज नव्यानं लाजते . .

 

आलं लावणीचं दीस
झाला चिखलमाखल
शेतामधे विरघळे
लाल मातीचं पाऊल
मऊशार चिखलात गोरी पोटरी भिजते . .

 

वैल बुडाले शेतात
पाय उचलेना वर
पावसानं बांधलंय
माझ्या शेतावर घर
दिवसाची ग, चिमणी ओल्या अंधारी विझते . .

 

तुला इरल्या आडून
वाटे , पहावं चोरून
शिटी वार्‍यानं घातली
तरी बघते वळून
जागेपणी अवचित उभ्याउभ्या मी निजते . .

 

दोरा विजेचा तुटतो
दाही दिशांना ये कळू ,
काळ्या ढगाची ग , चोळी
उसवते हळूहळू
डोंगराच्या पदराला नक्षी फुलांची सजते . .

 

 

प्रतिक्रिया टाका