आज आयुष्य का आवडू लागले ?

अक्षरगणवृत्त : स्रग्विणी
गण : गालगा गालगा गालगा गालगा ( यपा )
छंदोरचना पृष्ठ क्र. १९३ , ३२०

 

आज आयुष्य का आवडू लागले ?
प्रेम दु:खावरीही जडू लागले !

 

मूल मंत्र्यास होताच गावातले
पाळण्याच्याच पाया पडू लागले .

 

ह्या जगाला हवा गोड खोटेपणा . .
मी खरे बोललो ते कडू लागले !

 

दूर कोंड्यापरी मी उडालो कसा ?
ते जगावेगळे पाखडू लागले .

 

धर्म ज्याचा जसा , शब्द त्याचे तसे . .
गीत अंगावरी ओरडू लागले !

 

कोण आली इथे वेचण्याला फुले ?
गंध वेड्यापरी बागडू लागले !

 

.

प्रतिक्रिया टाका