आकाश झालंया जागं . .

गोमू , आकाश झालंया जागं जाऊ होरीत बसून दोगं . .

 

तांबर फुटलंय् कुकुवावानी
इझू लागली सुकराची चान्नी
बग, कोंबरा देतुया बांग . .

 

आमी लाडाची दर्याची पोरं
धाक डोल्यांचा मागं नि म्होरं
त्येच्या मनाचा लागंना थांग . .

 

थेंब लाटंचं उरती निलं

तुज्या येणीला आयती फुलं

भिजं कुरला कुरला भांग . .

 

किती सावरून पदर धरशी
बस , चिकटून अंगाशी आश्शी
गार कानाला वारा लागं . .

 

गोमू , आकाश झालंया जागं
जाऊ होरीत बसून दोगं .

प्रतिक्रिया टाका