असे सामान खोलीभर . .

वृत्त : जीवकलिका

गण : लगागागा लगागागा लगागागा लगागा+. ( + म्हणजे निश्चित गुरू )
असे सामान खोलीभर कशाला विस्कटावे मी ?
मघापासून म्हणतो की जरा घर आवरावे मी !

 

घरी आहे बसायाला तिच्यापुरतीच सतरंजी…
घडीने फाटकेपण हे किती वेळा शिवावे मी ?

 

हवेला लागता थोडी तिची चाहूल दाराशी
कडीने मंद वाजावे , इशारे ओळखावे मी

 

हिला मी उंबराचे फूल झालेले पहाताना ,
रडू येऊन वाटावे , असेसुद्धा हसावे मी !

 

मनस्वी भावना माझ्या कशा शब्दांत मांडाव्या ?
तिच्या डोळ्यांत लिहिलेले मुक्‍याने गीत गावे मी !

 

अशी ही अत्तराची सय मला भिजवून गेली की –
मनाने होउनी फाया, स्वतःशी दर्वळावे मी !

 

प्रतिक्रिया टाका