असा एकांत तार्‍यांना

मात्रावृत्त : जीवकलिका
लक्षणे : [ लगागागा l लगागागा l लगागागा l लगागा+ ] एकूण २८ मात्रा
+ म्हणजे निश्चित गुरू .

असा एकांत तार्‍यांना कधीही गावला नाही . .
रिकाम्या माणसांचाही अवेळी गल्बला नाही !

तुझ्या त्या ‘ दिव्य ‘ प्रेमाच्या विचारांतीच घे शपथा . .
गडे , ‘ पृथ्वी ‘ वरी माझा स्वतःचा बंगला नाही !

हवे ते शेवटी जाते , नको त्याच्याच वाट्याला
फुका वादात दोघांच्या , तुला नाही . . मला नाही !

पुन्हा येशील भेटाया अशी खात्री कुठे होती ?
मनाला जखडण्याजोगी खरे तर शृंखला नाही .

‘ भल्याची ही नसे दुनिया ‘ असे सारे जरी म्हणती ,
स्वतःला समजतो तितका कुणीसुद्धा भला नाही !

अशी जर संकटे येती मला आधीच सामोरी ,
मला उशिरा न कळते की , कुणीही ‘ आपला ‘ नाही !

तुला बदलून गेलेली जशी मी पाहिली तेव्हा ,

निरोपाच्या क्षणी माझा गळाही दाटला नाही .

लेखनकाल : दिनांक १९.१०.१९९९

प्रतिक्रिया टाका